रामनवमी उत्सवात मोठा हिंसाचार! मध्यप्रदेशमध्ये 77 जणांना अटक; झारखंडमध्ये एकाचा मृत्यू, 12 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:12 AM2022-04-12T09:12:56+5:302022-04-12T09:21:08+5:30
Ramnavami Violence : रामनवमी उत्सवास हिंसाचाराचे गालबोट लागले. चार राज्यांतील सहा शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या.
नवी दिल्ली - देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. पण काही ठिकाणी याच दरम्यान भयंकर घटना घडल्या. रामनवमी उत्सवास हिंसाचाराचे गालबोट लागले. चार राज्यांतील सहा शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. गुजरात आणि बंगालमध्ये परिस्थिती बिघडली होती. झारखंडच्या लोहरदग्गा येथे एकाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल 77 जणांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये रामनवमी उत्सवात झालेल्या हिंसाचारात पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी गोळीबारात जखमी झाले असून, सहा पोलिसांसह 24 जण या हिंसाचार आणि जाळपोळीत जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये नऊ जणांना हिंसाचार आणि दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. आणंद जिल्ह्यातील खंभात येथे रामनवमी मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली. साबरकंठा जिल्ह्यातील हिंमतनगरमध्येही हिंसाचारप्रकरणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथेही मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली.
हिंसाचारात एक जण ठार आणि 12 जखमी
झारखंडमधील लोहरदग्गा येथील हिऱ्ही गावाजवळ दोन समाजाच्या गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात एक जण ठार आणि 12 जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर काही लोकांनी दगडफेक केल्याने हा हिंसाचार उसळला. दहा दुचाकी आणि एक पिकअप व्हॅनही या परिसरात जाळण्यात आली. उपविभागीय अधिकारी अरविंदकुमार लाल यांनी या भागातील इंटरनेट सेवा खंडित केली असून, कलम 144 लागू केल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तुफान राडा! रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक; दोन गटात जोरदार हाणामारी, वाहनांची जाळपोळ
गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लागलं, साबरकांठा आणि आणंद येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या गाडीला देखील आग लावण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दोन्हीकडील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. दगडफेकीत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. खूप गाड्यांचे नुकसान झाले आहे. आक्रमक झालेल्या जमावाने दुकाने आणि वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.