मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या IAS पूजा सिंघल यांची ईडी पाच दिवस चौकशी करणार आहे. न्यायालयानं ईडीला चौकशीसाठी रिमांड घेण्याची परवानगी दिली आहे. ईडीने पूजा सिंघल यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे १२ दिवसांची परवानगी मागितली होती. परंतु त्यांना केवळ पाच दिवसांची परवानगी देण्यात आली. पाच दिवसांच्या चौकशीनंतर पूजा सिंघलला 16 मे रोजी पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
२०१८ मध्ये ईडीनं जेई राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्या विरोधात २ कोटी ७९ लाख ६९ हजार रुपांच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं होतं. सीएस सुमन सिंग यांच्यानंतर पूजा सिंघल यांना या प्रकरणी रिमांडवर घेण्यात आलं आहे. आता याच प्रकरणात पूजा सिंघल आणि इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
बुधवारी संध्याकाळी पूजा सिंघल यांना अटक केल्यानंतर ईडीनं त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. रुग्णालयातून एक टीम वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आली होती. त्यांचे रिपोर्टही नॉर्मल आले.
तुरुंगात कोणाशीही संवाद नाहीपूजा सिंघल यांना बुधवारची रात्र बिरसा मुंडा तुरुंगात घालवावी लागली. रात्री १० वाजता त्यांना तुरुंगात नेण्यात आलं त्यावेळी त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं आणि अचानक त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर तुरुंग प्रशासनानं त्वरित त्यांना औषध दिलं आणि त्यांची प्रकृती सुधारली. त्यानंतर पूजा सिंघल यांना महिला वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. रात्री अनेक महिला कैदी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आल्या. परंतु त्यांनी कोणाशीही संवाद साधला नाही. दरम्यान, त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती तुरूंग प्रशासनानं दिली.
खाण्यात चपाती, भाजीपूजा सिंघल यांना तुरुंगात नेल्यानंतर त्यांना जेवणासाठी चपाती, भाजी, डाळ आणि सॅलड देण्यात आलं. परंतु त्यांनी आपलं जेवण अर्धवट सोडलं. त्यांच्यासाठी मिनरल वॉटरचीही सोय करण्यात आली आहे. त्यांनी संपूर्ण रात्र पाणी पिऊनच घालवली.