अहमदनगर - यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या विरोधात खंडणी व बदनामी केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी मंगल किसन हजारे यांनी सोमवारी रात्री फिर्याद दिली. बोठे याने 11 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ बोलावून दहा लाख रुपयांची मागणी केली तसेच माझ्या विरोधात तो काम करत असलेल्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करून माझी बदनामी केली असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोठे याच्यासह एका वैद्यकीय अधिकारी भागवत दहिफळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान बोठे याच्या विरोधात दोन दिवसापूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला. एकामागून एक गुन्हे दाखल होत असल्याने बोठे चांगलाच अडचणीत सापडला आहे. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बोठे मात्र फरार असून गेल्या 27 दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.