पुणे : मैत्री करुन विश्वास संपादन केल्यानंतर काढलेल्या सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दोघा सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ वैभव दिलीप कातोरे आणि रोश दिलीप कातोरे (रा़ ओंकारपूरम सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी कोथरुडमधील एका २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आणि वैभव कातोरे हे मुळचे नाशिकला राहणारे आहेत. नाशिकमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची २०११ मध्ये ओळख झाली होती. शिक्षणानंतर ही तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली. त्यानंतर वैभवही भावासह पुण्यात राहायला आला.
त्याने जुनी ओळख काढून पुन्हा मैत्री करुन या तरुणीचा विश्वास संपादन केला. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करु लागला. तिला वारंवार फोन करुन लग्न करण्यासाठी जबरदस्ती करु लागला. ही तरुणी ज्या कंपनीत काम करीत होती. तेथेही तो जाऊ लागला. तेथील कर्मचाऱ्यांना तो ती आपली बायको असल्याचे सांगून दम देऊ लागला. तिचा पाठलाग करुन त्याने तिचा विनयभंगही केला होता. दरम्यान, या तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न जुळविण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार वैभवला समजल्यावर त्याने या तरुणीबरोबर काढलेले सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल करेल तसेच तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवेन, अशी धमकी दिली. तिला साडेसात हजार रुपये देण्यास भाग पाडले. वैभव याचा भाऊ रोशन हा पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. रोशनच्या मदतीने वैभव तिला त्रास देत होता. रोशन याने या तरुणीला फोन करुन मी मोबाईलच्या दुकानात आलो आहे, वैभवला फोन घ्यायचा आहे़ असे सांगून जबरदस्तीने १४ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करुन घेतला. दोघा भावांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे धाव घेतली़ पोलिसांनी विनयभंग, धमकी व खंडणी घेतल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध घेतला जात आहे़ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर अधिक तपास करीत आहेत.