अंबेजोगाई (जि.बीड) : ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी कथित ड्रग्ज माफियाने परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाला २४ तासही उलटत नाहीत, तोच अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी मंदिर संस्थानलाही ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अन्य एका कथित गुंडाने धमकीचे पत्र पाठविले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, भाविकांतून संताप व्यक्त होत आहे. या धमकीपत्रावर प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव नि. ता.जि.नांदेड) व एक मोबाइल क्रमांक नमूद आहे. यानंतर, मंदिर समिती सचिव ॲड.शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
परळी प्रकरणात दोघे ताब्यात परळी (जि.बीड) : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील वैद्यनाथ मंदिराला पत्राद्वारे धमकी दिल्याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पत्र ज्या नावाने आले, त्या व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) व ज्या पत्त्यावरून आले, त्या रतनसिंग रामसिंग दख्खने (रा.काळेश्वरनगर, विष्णुपुरी, नांदेड) यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांनीही अशा प्रकारचे पत्र आपण पाठविले नाही. खोडसाळपणातून आमच्या नावे पत्र पाठविली असावीत, असा दावा त्यांनी केला आहे.