नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. काँग्रेस आमदाराच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला होता. बडनगर भागातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. करणने लग्नाचं आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केलेला. पण तेव्हापासून आरोपी फरार झाला होता. अखेर सहा महिन्यांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
करण मोरवाल असं अटक (Karan Morwal) केलेल्या काँग्रेस आमदार पुत्राचं नाव आहे. करणवर पोलिसांनी बलात्कारासह अन्य गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षिसाची घोषणा देखील केली होती. पोलिसांनी सुरुवातीला 10 हजार, नंतर 15 हजार आणि काही दिवसांपूर्वीच 25 हजार रुपयांची घोषणा केली होती. आरोपी नेपाळला पळून गेल्याची शंका देखील व्यक्त केली जात होती. अखेर सहा महिन्यानंतर पोलिसांनी आरोपीला मक्सी येथून अटक केली आहे.
जीवे मारण्याची दिली धमकी
स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने गेल्या वर्षी करणशी ओळख झाली होती. त्यानंतर काही महिन्यांआधी तो तरुणीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याने बलात्कार केला तसेच कोणाला काही सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप पीडित तरुणीने केला होता. तसेच याची एक ऑडिओ क्लिप असल्याचं देखील तिने म्हटलं होतं.
पीडित तरुणी ही काँग्रेसची कार्यकर्ती
आमदाराच्या मुलाने आपल्याला धमकी दिल्याचा आणि याचा ऑडिओ रेकॉर्डिंग स्वरुपात आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा संबंधित तरुणीने केला होता. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं म्हटलं होतं. तर काँग्रेस आमदार मुरली मोरवाल यांनी आपल्या मुलाविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलेलं. पीडित तरुणी ही काँग्रेसची एक कार्यकर्ती आहे. गेल्या वर्षी तिची करण सोबत ओळख झाली होती.