नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका 9 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींनी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. तसेच, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत पीडित कुटुंबाच्या बाजुने उभं राहणार असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, स्थानिकांनीही रविवारी या घटनेविरोधात प्रदर्शन केलं. घटना दिल्लीतील ओल्ड नांगल गावातील आहे. येथील स्मशानातील वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी स्मशानातील पुजारी राधेश्यामसह 4 जणांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा मिटवण्यासाठी त्या मुलीचा अंत्यविधी केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
आरोपींनी पीडित कुटुंबाची दिशाभूल केलीमृत मुलगी वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी आली असता, तिला कूलरचा करंट लागून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपींनी केला. मुलीच्या कुटुंबियांनाही तसंच संगितलं. यासोबतच पोलिसांना सांगितलं तर ते बॉडीला पोस्ट मॉर्टमसाठी घेऊन जातील आणि तिथे तिच्या शरीराता अवयव काढून घेतील अशी भीतीही पीडित कुटुंबियांच्या मनात भरवली. यानंतर घाईघाईत मुलीचा अंत्यविधी उरकला. पण, नंतर कुटुंबियांनी हिम्मत करुन पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.