शहडोल - मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात १४ नोव्हेंबरला अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातील विहिरीत तरंगताना आढळला होता. या घटनेने गावात खळबळ माजली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर आता अल्पवयीन मुलीच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाचे मुलीसोबत संबंध होते आणि त्यातून ती गर्भवती राहिली होती अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
शिक्षक आणि अल्पवयीन मुलीशी संबंध असल्याने ती गरोदर राहिली. त्यामुळे मुलीने लग्नासाठी शिक्षकावर दबाव टाकला. मुलीच्या या मागणीला कंटाळून शिक्षकाने औषधाच्या नावाखाली तिला विष पाजलं आणि त्यानंतर तिची हत्या केली. याबाबत शहडोल पोलीस अधीक्षक कुमार प्रतिक म्हणाले की, अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला होता. हत्येचा कुणी साक्षीदार नव्हता. कुणावरही संशय नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं.
घटनेचे गांभीर्य ओळखत एसपींनी २ डीसीपी, ६ पोलीस अधिकारी यांची टीम बनवली. त्यांनी प्रत्येक अँगलने शोध सुरू केला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मुलगी गर्भवती होती असं कळालं. त्यानंतर प्रेम प्रकरणाच्या दिशेने पोलीस तपास सुरू झाला. तपासात अल्पवयीन युवती गावातील एका युवकासोबत वारंवार बोलायची हे समजलं. आरोपी तिच्या शाळेतील शिक्षक होता आणि तो तिच्या शेजारी राहायचा. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सर्व उघड झालं.
आरोपीनं सांगितले की, मुलीसोबत माझे संबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली. वारंवार ती माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. तिच्यापासून सुटका व्हावी यासाठी मी तिची हत्या केली आणि गावातील विहिरीत मृतदेह फेकला. आरोपी शिवेंद्र हा बीएससी बायोकेमेस्ट्रीचा विद्यार्थी होता. त्यामुळे त्याला काय खायला घातल्याने शरीरात विष पसरेल हे माहिती होते. युवती गर्भवती असल्याने तिला खोटं बोलून औषध पाजलं. जे खाल्ल्यानंतर युवतीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह विहिरीत फेकला. आरोपीने गुन्हा कबुल केला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"