लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्यातील शासकीय विश्रामगृहात महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
मुलाचा सांभाळ करतो, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवून, चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठीची आर्थिक तरतूद म्हणून दिलेले चेक वटले नाही. महिलेला जिवे मारण्याची धमकी, अशी तक्रार नाेंदविली आहे. या प्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय ६५, रा. सोलापूर), त्याचे साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत २०१२ पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे. उत्तम खंदारे हे शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री होते.
उत्तम खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. बी रेस्ट हाऊस येथे बोलावून चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न केला. त्यातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. त्यांना मुलगा झाला. या मुलाच्या संगोपनासाठी खंदारे याने आर्थिक तरतूद म्हणून धनादेश दिले. ते धनादेश वटलेच नाही. तेव्हा फिर्यादी यांनी ही बाब त्यांना सांगितल्यावर त्याने व इतरांनी फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. जिवाच्या भीतीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.