कल्याण - कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने बलात्कार करुन तिच्याजवळील मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली होती. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची 5 तपास पथके आरोपीच्या शोधात होती.अखेर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. अश्विन राठवा असे या नराधमाचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणी कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात राहते. ती एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करते. 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली. तिच्या भावाने कल्याण पूर्व भागातील स्टेशन परिसरात तिला सोडले. त्यानंतर ती रस्त्याने पूर्व भागातून पश्चिमेला गेली. कल्याण पश्चिमेतील रेल्वे कॉलनीत पोहचली असता एका निजर्नस्थळी आरोपी तिचा पाठलाग करत होता. साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपीने तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिचा मोबाईल हिसकावून तो पसार झाला. ही तरुणी कशीबशी सुभाष चौकात पोहचली. ज्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी तिला बस पकडायची होती, तिथे एका महिलेने तिला पाहिले. तिच्या सोबत काय घडले असावे, याची कल्पना तिला लगेच आली. तिने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने या तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.
कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता. हा आरोपी ठाणे सीसीटीव्हीतही दिसून आला. कल्याणचे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत होते. अखेर नऊ दिवसांनी आरोपीचा सुगावा लागला.
महात्मा फुले पोलिसांनी आरोपीच्या एका मित्राला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आरोपी कोण आहे, तो कुठे आहे याची माहिती घेतली. पोलिस अधिकारी दीपक सरोदे, पोलिस कर्मचारी सचिन भालेराव, सोमनाथ ठिकेकर, रविंद्र हासे यांचे तपास पथक गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहचले. नराधम अश्विन राठवा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तरुणीचा मोबाईलही देखील हस्तगत केला आहे. आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस अधिकारी मंजूषा शेलार करीत आहेत.