पुणे : उद्योजक तरुणीच्या घरातील लोकांसमोर मंगळसुत्र आणि कुंकु लावून लग्न केल्याचा आभास निर्माण करुन तिच्यावर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जबरदस्तीन शारीरिक संबंध ठेवून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी बाणेर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़.
अमित रंजन महापात्रा (वय ३०, रा़ श्रीपल होम्स, अजिंक्य पार्क, बाणेर) असे या तरुणाचे नाव आहे़. ही घटना ७ जुलै ते ५ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान बाणेर येथील महापात्रा याच्या घरी तसेच मुंबईतील हॉटेल सन अँड सॅन या ठिकाणी घडली़. याप्रकरणी वानवडीतील २९वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे़.याबाबत पोलिसांनी सांगितले की, या तरुणीच्या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे़. सध्या ती हा व्यवसाय चालविते़. अमित महापात्रा हा काही काम धंदा करत नाही़. या दरम्यान दोघांची ओळख झाली़ त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले़. आपणही बिझनेस करणार असल्याचे भासवून त्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले़.
आपले हे नाटक खरे वाटावे , म्हणून त्याने तिच्या घरातील लोकांच्या समक्ष या तरुणीला मंगळसुत्र घातले व कुंकुही लावले आणि लग्न झाल्याचा आभास निर्माण केला़. या लग्नानंतर त्याने तिला आपल्या बाणेर येथील घरी नेले़. तेथे तसेच मुंबईतील जुहू येथील हॉटेल सन अँड सॅनमध्ये नेले़. तेथे तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले़. या बनावट लग्नानंतर काही दिवसातच या तरुणीला त्याचे खरे रुप लक्षात येऊ लागल्यावर त्यांच्यात वाद होऊ लागले़, तेव्हा तो तिला हाताने मारहाण व शिवीगाळ करु लागला़. शेवटी या छळाला कंटाळून या तरुणीने वानवडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता़. या अर्जाची दखल घेऊन पोलिसांनी अमित महापात्रा याच्याविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़. महिला पोलीस उपनिरीक्षक गिरीजा म्हस्के अधिक तपास करीत आहेत़.