संगमनेर : नाशिक येथील एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला असलेल्या २३ वर्षीय विवाहित महिलेस तुला नोकरी लावून देतो, असे सांगत तिला संगमनेरात बोलावून घेत तिचा विनयभंग करण्यात आला. हा प्रकार बुधवारी (दि. २६) दुपारी चार वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानक परिसरात घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संबंधित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
किरण किसन आहेर (रा.लोणी, ता.राहाता) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. २३ वर्षीय विवाहित महिला नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी विवाहित महिलेकडून तिच्या मैत्रिणीला व्हॉटस्ॲपवरून संदेश पाठविण्याऐवजी चुकीने दुसऱ्याच क्रमांकावर संदेश पाठविला गेला. त्यानंतर समोरील व्यक्ती विवाहित महिलेला दररोज संदेश पाठवायचा. त्या दोघांत संदेशाद्वारे संभाषण झाले. विवाहितेने त्यास ‘तुम्ही कुठले आहात, काय करता’ असे विचारले असता त्याने त्याचे नाव किरण आहेर पाटील असल्याचे सांगत लोणी येथे राहत असून माझ्या शिर्डीत शाळा, कॉलेज असल्याचे सांगितले. ‘तुमच्या कॉलेजवर नोकरी भेटेल काय?’ असे महिलेने विचारले असता तो भेटेल बोलला. संगमनेरमध्ये सुद्धा माझे मित्र आहेत, त्यांच्याकडे नोकरी भेटू शकते. असेही त्याने सांगितले.
२५ जुलैला त्याने विवाहितेला संदेश पाठवून संगमनेरला त्याच्या डॉक्टर मित्राचे हॉस्पिटलला नोकरी देतो, उद्या संगमनेरला बायोडाटा, आधार कार्ड व फोटो घेऊन बोलविले. त्यानुसार २६ जुलैला विवाहिता संगमनेरात आली. आहेर याने काही डॉक्टरांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याने फोन करत मी संगमनेरला येऊ का, आल्यानंतर तुला हॉस्पिटल दाखवतो. असे तो म्हणाला. पंधरा-वीस मिनिटांनी त्या दोघांची बसस्थानक परिसरात भेट झाली. त्याने विवाहितेला गाडीत बसण्यास सांगितले असता तिने नकार दिला. गाडीच्या बाहेर येऊन तो तिच्या शेजारी उभा राहिला, तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होइल, असे तो बोलू लागला. त्याने त्याच्या मोबाइलमध्ये तिचे फोटो काढले. याचा महिलेला राग आल्याने तिने त्याचा मोबाइल हिसकावून घेत रस्त्यावर आपटला. तसेच त्याच्या गालावर दोन चापट मारत पोलिसांच्या ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईन क्रमाकांवर फोन केला. पोलीस तातडीने तेथे आले. त्यांनी आहेर याला ताब्यात घेतले. त्यांच्यावर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून पोलिस हेड कॉस्टेबल पारधी अधिक तपास करीत आहेत.