- डॉ. खुशालचंद बाहेतीअलाहाबाद : ४३ वर्षांपूर्वी (१९७९ मध्ये) एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व सध्या जामिनावर असलेल्या नराधमाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.४ ऑक्टोबर १९७९ रोजी १० वर्षांची मुलगी शेतात गवत कापत होती. ओमप्रकाश याने तिला पकडून ज्वारीच्या शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिचा आरडाओरडा ऐकून वडिलांनी व इतरांनी त्याला पकडले, मात्र तो त्यांना ढकलून पळून गेला. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्याच दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला. ४ डिसेंबर १९७९ रोजी पोलीसांनी आरोपीविरुद्ध चार्जशीट दाखल केले. मेरठच्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी १९८२मध्ये त्याला दोषी ठरवत ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.शिक्षेला आव्हान देत, ओमप्रकाश याने १९८२ मध्ये उच्च न्यायालयात अपील केले आणि जामिनावर सुटला. ४० वर्षांनंतर या अपिलाचा निर्णय झाला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी यांची साक्ष झाली नसल्याचा प्राथमिक युक्तिवाद होता. त्याला दोषी ठरवण्यात आले तेव्हा त्याचे वय २८ वर्षे होते आणि आता त्याचे वय सुमारे ६८ वर्षे आहे, घटना १९७९ ची आहे आणि तेव्हापासून ४३ वर्षे उलटून गेली आहेत, त्यामुळे त्याला आता तुरुंगात पाठवणे खूप कठोर ठरेल, असेही म्हणणे मांडण्यात आले.न्यायमूर्ती समित गोपाल यांनी निरीक्षण केले की, आरोपीचे वय हे त्याला कोणताही फायदा देण्यासाठी कारण असू शकत नाही. हायकोर्टाने अपील फेटाळले आणि ओमप्रकाशला शिक्षा भोगण्याचे आदेश दिले.
३३ वर्षांनी ठरला दोषीयाच वर्षी मार्चमध्ये अलाहाबाद हायकोर्टाने मे १९८८ मध्ये, १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी म्हणजे घटनेच्या ३३ वर्षांनंतर एका आरोपीला दोषी ठरवले. हायकोर्टाने १९८९ मध्ये ट्रायल कोर्टाच्या दोषमुक्तीच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले सरकारी अपील मान्य करत आरोपीला शिक्षा दिली.