झारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री एका स्पॅनिश महिला पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आता गँगरेप पीडितेने कथन केलेल्या घटनेची भयावह कहाणी अंगावर काटा आणणारी आहे.
स्पॅनिश पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, घटनेदरम्यान सात आरोपी तिला सतत लाथाबुक्क्या मारत होते. एवढेच नाही तर बलात्कार करणाऱ्या आरोपीने तिच्या पतीचे हात बांधले आणि त्याला मारहाणही केली असं तिने पोलिसांना सांगितले. आरोपी माझी हत्या करतील असं वाटलं, परंतु देवाच्या कृपेने आज मी जिवंत आहे असंही ती म्हणाली. दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला.
२८ वर्षीय स्पॅनिश महिला आणि तिचा ६४ वर्षीय पती बांगलादेशातून वेगवेगळ्या बाइक टूरवर निघाले होते आणि झारखंडमार्गे नेपाळला जात होते. त्यावेळी शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर स्पॅनिश महिलेला सरैयाहाट सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ ही घटना घडली.
या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषदेत एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी सांगितले की, महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात जणांपैकी तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली असून उर्वरित चौघांना लवकरच पकडण्यात येईल. इतर चार आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस नवी दिल्लीतील स्पेनच्या दूतावासाच्या संपर्कात आहेत असं त्यांनी सांगितले.
भाजपानं राज्य सरकारला घेरलं
झारखंडमध्ये परदेशी महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर भाजपाने राज्य सरकारविरोधात मोर्चा काढला आहे. ही घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. महिला सुरक्षित नाहीत. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत भाजपानं राज्य सरकारवर निशाणा साधला.