नवी मुंबई : रात्रीच्यावेळी चौकशीच्या बहाण्याने तरुणीला अडवून पोलिसानेच तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पवईच्या आयआयटीमध्ये शिकणारी ही तरुणी आहे. दरम्यान, सानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्यानंतर तरुणीने पवई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. अखेर संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सानपाडा येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सानपाडा येथे राहणारी तरुणी तिच्या मित्रासह परिसरातून चालली होती. यावेळी सानपाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी दीपक राठोड याने चौकशीच्या बहाण्याने त्यांना थांबवले. त्यानंतर तरुणीकडे मोबाइल नंबर मागून तिने तो देण्यास नकार दिल्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केले. यामुळे संतप्त तरुणी तक्रार करण्यासाठी सानपाडा पोलिस ठाण्यात आली असता तिची दखल घेतली नाही. यामुळे तिने संपूर्ण प्रकार आयआयटीमधील वरिष्ठांना कळवला होता. त्यांनी पवई पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करून तो सानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार राठोड याला अटक करण्यात आली असून तो पोलिस वाहनचालक आहे. त्याच्या या कृत्याची दखल घेत त्याचे निलंबन करण्यात आले आहे.
पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, सानपाडा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 9:22 AM