लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देवून अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने गुरूवारी आरोपी खासगी क्लासचा शिक्षक तुषार शांताराम माळी (३३, रा. नशिराबाद परिसर) याला मरेपर्यंज जन्मठेप व सव्वा लाख दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन.माने (गाडेकर) यांनी दिला.
आरोपी तुषार माळी याचा नशिराबाद परिसरामध्ये श्रीसमर्थ क्लासेस नावाने शैक्षणिक क्लास चालविण्याचा व्यावसाय होता. अल्पवयीन विद्यार्थिनीची ईच्छा नसताना तिच्या आई-वडीलांना भेटून तुमच्या मुलीला शिष्यवृत्तीचा क्लास माझ्याकडे लावा, मी तुमच्या कडून फी चे पैसे घेणार नाही, असे माळी यांनी सांगून विद्यार्थिनीला त्याच्याकडे क्लास लावण्यास सांगितले. ऑगस्ट २०१७ पासून विद्यार्थिनी क्लासला जायला लागली. माळी हा विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या बॅचच्या एक तास अगोदर क्लासमध्ये बोलवून चॉकलेट खाण्यास द्यायचा. त्यानंतर घरामध्ये नेवून अत्याचार केले. त्याने डिसेंबर-२०१७ ते फेब्रुवारी-२०१८ या कालावधीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करेल ही धमकी देवून वारंवार अत्याचार केले. तसेच दोघांचे फोटो लोकांना दाखवून बदनामी करेल, अशीही धमकी शिक्षक माळी हा देत होता.
त्यामुळे ही घटना विद्यार्थिनीने कुणाला सांगितली नाही. मात्र, मार्च-२०१८ मध्ये विद्यार्थिनीचे पोट दुखत असल्यामुळे तिला तिच्या आईने जळगावातील रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी विद्यार्थिनी ही गर्भवती असल्याची बाब समोर आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात तुषार माळी याच्याविरूध्द भादंवि कलम ३७६ (२)(एफ)(आय)(एन) ५०६ प्रमाणे व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा कलम ३ (अ), ४,५ (ज)(२), ५ (एल), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.१६ साक्षीदार तपासले...हा खटला जिल्हा न्यायालयातील जिल्हा सत्र व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन.माने यांच्या न्यायालयात सुरू होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित विद्यार्थिनी, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या समोर आलेलया संपूर्ण पुराव्याअंती तुषार माळी यांना दोषी धरून गुरूवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सहाय्यक सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. तर तपास अधिकारी म्हणून आर.एन.खरात यांनी तर सदर प्रकरणासाठी पैरवी नरेंद्र मोरे, विजय पाअील, गुणवंत सोनवणे यांचे सहकार्य लाभले.अशी सुनावली शिक्षा....- भादंवि कलम ३७६ (२)(एफ) व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा कलम ३, ४ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाची साधी कैद.- भादंवि कलम ३७६ (२)(आय) व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा कलम ३, ४ प्रमाणे त्यांच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाची साधी कैद.- भादंवि कलम ३७६ (२)(एन) प्रमाणे नैसर्गिक आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाची साधी कैद- बालकाचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा कलम ५, (जे) (||) प्रमाणे त्याच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाची साधी कैद.- भादंवि कलम ५०६ प्रमाणे ७ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.- दरम्यान, दंडाच्या संपूर्ण रक्कमेतून ५० टक्के रक्कमी ही पीडित विद्यार्थिनीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.पुर्नवसनासाठी १० लाख देण्याचे आदेशया प्रकरणामध्ये पीडित विद्यार्थिनीला बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण नियम २०१२ मधील कायदा ७ नुसार महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रूपये रक्कम पुर्नवसनासाठी देण्याचे आदेश देखील जिल्हा न्यायालयाने दिले आहे.