लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव (जि. जळगाव) : बलात्कारप्रकरणी सात वर्षे शिक्षा भोगून परत आलेल्या आरोपीने पाच वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवित पुन्हा बलात्कार केला. ही घटना शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथे रविवारी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी आरोपीस रात्रीच मनमाड येथून अटक करण्यात आली.
संदीप सुदाम तिरामली (३७, रा. शिरसगाव) असे आरोपीचे नाव आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला. तो मनमाड येथे असल्याची माहिती मिळताच, मेहुणबारे पोलिसांनी मनमाड येथे जाऊन रेल्वे स्टेशनवर त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेनंतर अवघ्या दोन तासांतच आरोपीला गजाआड करण्यात आले.
आरोपी संदीपने काही वर्षांपूर्वी पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केला होता. यात त्याला ७ वर्षांची शिक्षा झाली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो परतला होता. रविवारी पुन्हा बालिकेवर बलात्कार केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.