अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर नगर परिसरातील एका महिलेनं वाघमारे यांच्यावर हा आरोप केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, दिवसभर पोलीस ठाण्यात बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य घेण्यासाठी पीडित महिला सुनील वाघमारे यांच्या घरी गेली असता संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतरही दोन वेळा वाघमारे याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेचं म्हणणं आहे. घटनेनंतर काही दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करायचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचं पीडितेने आपल्या अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर याबाबत कुठेही वाच्यता केली तर वाघमारेने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर मंगळवारी रात्री उशिरा सुनील वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे दुपारपासून ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बसली होती, त्याचवेळी आरोपी सुनील वाघमारे याला चौकशीसाठी पोलोसांनी पोलीस ठाण्यात आणून बसवलले होते. मात्र रात्री अचानक सुनील वाघमारे पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. सुनील वाघमारे पोलीस ठाण्यातून कोणाला विचारून बाहेर गेला किंवा त्याला बाहेर जाण्यास कोणी मदत केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
लॉकडाऊनमध्ये मदतीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार; माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 2:39 PM
Rape : दिवसभर पोलीस ठाण्यात बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य घेण्यासाठी पीडित महिला सुनील वाघमारे यांच्या घरी गेली असता संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे.