अमरावती: तिवसा तालुक्यातील मार्डी येथील बलात्कारी भोंदू गुरूदासबाबाच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. गुरूवार दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास त्याला मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका लॉजाबाहेरून अटक करण्यात आली. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याला अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालयी आणण्यात आले.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी २५ जानेवारीला रात्री मार्डी येथील सुनील कावलकर ऊर्फ गुरुदासबाबा (वय ४७) या भोंदूविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याचदिवशी अन्य एका महिलेच्या तक्रारीवरून त्याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदविण्यात आला. त्याच्या शोधार्थ पोलिस पथके यवतमाळातील वणी, नागपूर, वर्धा येथील त्याचे आश्रमवजा घर तथा मध्य प्रदेशातील काही ठिकाणी जाऊन आली. मात्र तो मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुरूदासबाबाच्या एका भक्ताच्या हालचालीवर लक्ष ठेवले.
अखेर एफआयआरच्या १४ व्या दिवशी ८ फेब्रवारी रोजी त्याच भक्ताच्या माध्यमातून सुनील कावलकर उर्फ गुरूदासबाबा हा दिल्लीहून भोपाळला येत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्याआधारे एलसीबीच्या पथकाने गुरूवारीच भोपाळ गाठले. तथा पक्क्या माहितीच्या आधारे त्याला गुरूवारी रात्री भोपाळ रेल्वेस्टेशनलगतच्या एका लॉजबाहेरून ताब्यात घेतले. ओळख पटविल्यानंतर एलसीबीचे पथक त्याला घेऊन शुक्रवारी सकाळच्या सुमारास अमरावतीत पोहोचले. येथे आणल्यानंतर अपर अधीक्षक पंकज कुमावत तथा चांदुर रेल्वेच्या एसडीपीओंसह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांच्यासमोर त्याची पेशी झाली. त्याला शुक्रवारी दुपारी तिवसा न्यायालयात हजर करण्यात आले. गरम तव्याच्या कोपऱ्यावर बसून भक्तांना अश्लिल शिविगाळ करणाऱ्या भोंदू गुरूदासबाबाचा व्हिडीओ मार्च २०२३ मध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. हे विशेष.