लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात ज्येष्ठ आयपीसी अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गेल्याच आठवड्यात गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राजकीय हेतूने व नाहक आपल्यावर आरोप करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे. गुरुवारी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्या. पी. बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका नमूद केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदेशीररीत्या फोन टॅप केल्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त (स्पेशल ब्रँच) राजीव जैन यांनी तक्रार केली. शुक्ला यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १६५ व टेलिग्राफ कायद्याचे कलम २६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यानेही शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. तो गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठीही शुक्ला यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. ४ मार्च रोजी न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना २५ मार्चपर्यंत अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर पुण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.