संतापजनक! आईला "ओम नमः शिवाय" म्हणायला सांगितलं, डोळे मिटताच विहिरीत ढकललं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:38 AM2021-10-11T11:38:53+5:302021-10-11T11:44:48+5:30
Crime News : मुलाने आईला विहिरीच्या काठावर उभं करून तिला "ओम नमः शिवाय" असं म्हणायला लावून विहिरीत ढकलून दिलं.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मुलाने आईला विहिरीच्या काठावर उभं करून तिला "ओम नमः शिवाय" असं म्हणायला लावून विहिरीत ढकलून दिलं. यानंतर मुलगा फरार झाला आहे. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र आपल्या मुलावर कुठलीही कारवाई करू नका असंच त्याची आई म्हणत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैलाना येथील महालक्ष्मी परिसराच य़ा घटनेने एकच खळबळ उडाली. कलाबाई असं या 60 वर्षीय महिलेचं नाव असून त्या दिव्यांग आहेत. त्यांना 22 वर्षांचा पुष्कर नावाचा मुलगा आहे. त्याला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र अनेक दिवसांपासून त्याचं लग्न जमत नव्हतं. आपल्याला लग्न करायचं असून त्यासाठी 5 हजार रुपयांची गरज असल्याचं त्याने कलाबाईंना सांगितलं. कलाबाईंकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी मुलाची मागणी फेटाळून लावली. याचाच राग मनात धरून पुष्करने आईलाच मारण्याचा कट रचला.
पुष्करने पाठीमागून जोरदार धक्का देत आईला विहिरीत ढकललं
पुष्करने आईला आपल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याकडे एक उपाय असल्याचं सांगितलं. हातात नारळ घेऊन एका विहिरीच्या काठावर उभं राहायचं, डोळे मिटून ‘ओम नमः शिवाय’ म्हणायचं आणि नारळ विहिरीत फेकून द्यायचा, असं त्याने आईला सांगितलं. मुलावर विश्वास ठेवत आईने मंत्र म्हणण्यासाठी विहिरीच्या काठावर उभं राहत डोळे मिटले. त्यानंतर पुष्करने पाठीमागून जोरदार धक्का देत आईला विहिरीत ढकलून दिलं. मात्र विहिरीत पडल्यानंतर मोटारीची वायर हाताला लागल्यामुळे कलाबाई विहिरीत बुडण्यापासून वाचल्या.
पोलीस या प्रकरणाचा करताहेत अधिक तपास
कलाबाई विहिरीत पडल्याचं समजताच शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. शेजाऱ्यांनी सांगितल्यावरही कलाबाई आपल्या मुलाविरुद्ध तक्रार करायला तयार नव्हत्या. त्याला कुठलाही त्रास होऊ नये, असंच त्यांचं म्हणणं होतं. लोकांच्या आग्रहानंतर त्यांनी तक्रार नोंदवली असली, तरी मुलाला शिक्षा झाल्यास तक्रार मागे घेणार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.