नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाचा पाय कुरतडल्याचा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुरतडल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक समिती स्थापन केल्याची माहिती मिळत आहे.
महाराजा यशवंतराव चिकित्सालय (एमवायएचचे) अधीक्षक प्रमेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या रुग्णालयामध्ये लहान मुलांची देखभाल करण्यासाठी जो कक्ष आहे तिथे एका बाळाचा पाय उंदाराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुरतडला असून या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत." ठाकूर यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन सदस्य असणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं देखील म्हटलं आहे.
एमवायएचच्या अधीक्षकांनी ज्या बाळासोबत हा प्रकार घडला त्याची माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार बाळाचा जन्म नियोजित वेळेआधीच झालेला, म्हणजेच बाळ हे प्री मॅच्यूअर बेबी आहे. बाळाचं वजन 1.4 किलो इतकं आहे. या बाळाला देखरेखीसाठी वॉर्मर म्हणजेच उष्ण काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेलं. सकाळी बाळाची आई दूध पाजण्यासाठी गेली असता तिला धक्काच बसला. बाळाच्या पायांना जखमा असल्याचं दिसलं. त्यानंतर तेथे असणाऱ्या आरएसओला अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं. सर्जनने बाळाची तपासणी केली. त्यावेळी बाळाचा पाय उंदराने कुरतडल्याचं स्पष्ट झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! रुग्णालयाने कोरोना मृतांचा आकडा लपवला; 19 दिवसांत तब्बल 65 जणांच्या मृत्यूने खळबळ
देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एका खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 19 दिवसांत तब्बल 65 रुग्णांचा मृत्यू झाला मात्र रुग्णालयाने हे महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वार येथील बाबा बर्फानी रुग्णालय प्रशासनाने कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची नेमकी माहिती आरोग्य विभागाला दिलेली नाही. कोरोना रुग्णाच्या मृत्यूची सूचना ही 24 तासांच्या आत राज्याच्या कोविड कंट्रोल रुमला देण्याचे निर्देश सरकारच्या वतीने कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना देण्यात आले आहेत. बाबा बर्फानी रुग्णालयात 25 एप्रिल ते 12 मे पर्यंत उपचारादरम्यान 65 रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे.