जळगाव : रावेर शिवारातील बोरखेडा रस्त्यालगत बलात्कार आणि चारही बहीण भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी आता सामूहिकबलात्काराच्या दिशेने पोलीस तपासाची चक्रे फिरली आहेत. डीएनए तपासणीसाठी २० जणांचे नमुने मंगळवारी रावेर ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात चौथा संशयित जाळ्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी मंगळवारी फिरते न्यायवैद्यकशास्त्र तपासणी पथक व श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे पोलीस तपासाकडे जनते लक्ष केंद्रीत झाले आहे. नाशिक विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर हे गेल्या पाच दिवसांपासून रावेर येथे तळ ठोकून आहे. विशेष पोलीस तपास पथकाने प्रथमदर्शनी असलेल्या तीन संशयित आरोपींना गुन्हा उघडकीस आणल्यापासून एक तासाभरात ताब्यात घेतले असले तरी त्यांना अटक केलेली नाही. मंगळवारी विशेष पोलीस तपास पथकाने सायबर क्राईम, न्यायवैद्यकशास्त्र, रासायनिक पृथ्थकरण व तांत्रिक अहवालाच्या आधारे २० संशयितांचे डीएनए नमुने रावेर ग्रामीण रुग्णालयात घेतले. हे नमुने नाशिक येथील न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. यासंदर्भात मात्र पोलीस पथकांनी कमालीची गोपनीयता राखली आहे.
पोलिसांच्या ताब्यात सध्या तीन जण आहेत. त्यांच्या पडद्याआड आणखी नवीन खलनायक तर नाहीत ना? यासंबंधी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, प्रमुख तीन संशयितांमध्ये दोन संशयित हे सख्खे चुलतभाऊ आहेत. केºहाळे येथील तिसºया आरोपीचा सख्ख्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी जंजीर या श्वानपथकाच्या मदतीने गुन्ह्यातील जप्त केलेल्या ऐवजाचा व त्या चौथ्या संशयिताची काही माहिती मिळतेय काय ? याची तपासणी सुरू होती.