मुंबई - रवी पुजारी गँगच्या शार्प शूटर्सला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. सादिक इब्राहिम बंगाली उर्फ बंटा (वय-४०) आणि धवल चंद्रप्पा देवरमानी (वय – ३७) अशी आरोपींची नावे आहेत. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पाळत ठेवून दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्या अंगझडतीत चार पिस्तूल आणि २९ काडतूस पोलीस पथकाने हस्तगत केली. दोन आरोपींना डिसीबी गुन्हे शाखेच्या कक्ष -९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आलेली आहे. पोलीस पथक आरोपींची कसून चौकशी करीत आहे.
आरोपी सादिक इब्राहिम बंगाली उर्फ बंटा हा खंडणी उकळणारा गँगस्टर रवी पुजारीचा शार्प शूटर असून त्याच्यावर २००६ साली प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्यावर फायरिंग केल्याचा गुन्हा आहे. २००८ मध्ये देविदास चौगुले हत्या प्रकरणाचा आरोप आहे तर २०१५ मध्ये लोणावळा येथील डबल मर्डर केसचा आरोपी सादिक असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी दिली. अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी धवल चंद्रप्पा देवरमानी हा नवी मुंबई पोलिसांचा खबरी असून तो उत्तरप्रदेश आणि बिहारमधून हत्यारे आणून ती विविध गँगस्टर यांना पुरविण्याचा त्याचा धंदा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस पथकाने सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. संशयास्पद हालचाली असलेल्या दोघांना पोलिसांनी हटकले आणि ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता या दोन आरोपींकडून पोलिसांनी चार पिस्तूल आणि २९ काडतुसे हस्तगत केली. पोलिसांनी दोघांविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भा. दं. वि. विनापरवाना प्राणघातक शस्त्र बाळगण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.