अझहर शेख
नाशिक : कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (दि.29) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात त्यास हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायलायीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी पुजारीचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले नसल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले आणि त्याच्याकडे आधारकार्डदेखील नसल्याची बाब यावेळी न्यायालयापुढे आणली. यामुळे पुजारीचे लसीकरण करायचे कसे? असा पेच निर्माण झाला असता न्यायालयाने स्वतंत्र आदेश काढून पुजारीला कोरोना प्रतिबंधक लस देऊन मगच तुरुंगात न्यावे असे सांगितले. त्याआधारे त्याचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण करण्यात आले.
खंडणी वसुलीसाठी दहा वर्षांपूर्वी नाशकात गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुख्यात रवी पुजारीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. सात दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्याने त्यास न्यायालयात उभे करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाचा फैलाव लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने पत्र देत पुजारीचे लसीकरण झाले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याला कारागृहात दाखल करुन घेण्यास अडचण निर्माण होईल. तत्पूर्वी लसीकरण केले जावे असे पत्रात म्हटले होते. तपासी अधिकाऱ्यांनी हे पत्र न्यायालयात सादर केले. कोविड लस घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर आधारकार्ड व मोबाईल क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे आणि रवी पुजारीकडे आधारकार्डच नसल्याने त्याला लस कशी द्ययाची? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. कारण कारागृह प्रशासनाच्या पत्रानुसर लसीकरण झाल्याशिवाय पुजारीला कारागृहात प्रवेश मिळणार नव्हता. पुजारीच्या लसीकरणाचा हा पेच नाशिकच्या विशेष मोक्का न्यालायाने लसीकरणाचे स्वतंत्र आदेश करत सोडविला.
पुजारी म्हणाला 'मी सेनेगालचा नागरिक'
आधार कार्ड रवी पुजारी कडे नसल्याने यंत्रणेपुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे न्यायालयाने पुजारीला आधारकार्डबाबत विचारणा केली असता त्याने 'मी भारताचा नागरिक नाही, मी सेनेगालमध्ये वास्तव्यास होतो. माझ्याकडे 'आधारकार्ड'सारखे कुठलेही कागदपत्र नाही' असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाच्या स्वतंत्र आदेशानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात रवी पुजारीला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आणि तेथून त्याचा मुंबईच्या ऑर्थ ररोड कारागृहाच्यादिशेने कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरू झाला.