पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे याचा या गुन्ह्यांशी असलेला संबंध व त्याच्या भूमिकेविषयी सरकार पक्षाने समोर आणलेले पुरावे लक्षात घेता तोच या टोळीचा मुख्य सुत्रधार आहे, असे निरीक्षक नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने रवींद्र बर्हाटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय दिला आहे.खंडणी प्रकरणी पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रवींद्र बर्हाटे व अमोल चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दोघांचेही अर्ज फेटाळून लावल्यानंतर कोथरुड पोलिसांनी अमोल चव्हाण याला अटक केली आहे. मात्र, रवींद्र बर्हाटे हा अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांना धमकावुन खंडणी वसुल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह देवेंद्र जैन, शैलेश जगताप यांना अटक केली होती. त्यांची आता जामिनावर सुटका झाली आहे.कोथरुड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यानंतर यांच्यावर शहरातील आणखी काही पोलीस ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग, जीवे मारण्याची धमकी देणे अशा वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत.
रवींद्र बर्हाटे यांच्या जामीन अर्जाला सरकारी वकील देशमुख यांनी विरोध केला. त्यासाठी पुरेसा पुरावा सरकार पक्षाने सादर केला आहे. न्यायालयासमोर आणलेल्या बाबी त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यासाठी पुरेशा आहेत. बर्हाटे यांच्या घरझडतीत ५२ जमिनीच्या पॉवर ऑफ अॅटर्नी आढळून आल्या आहेत. तसेच यातील आरोपींचे एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर फोन कॉल झालेले दिसून येत आहेत. त्यावरुन सर्व आरोपी हे एकमेकांशी सतत संपर्कात होते, हे सिद्ध करण्यास पुरेसे आहेत. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्नाटकी यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, त्याचा अर्जही बर्हाटे यांच्या सांगण्यावरुन टाईप केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने बर्हाटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.