नुकत्याच झालेल्या हजारीबाग येथील घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांच्या महिंद्रा फायनान्सच्या रिकव्हरी एजंटने दिव्यांग शेतकऱ्याच्या मुलीला कथितरित्या ट्रॅक्टरखाली चिरडले होते. यावर आता आरबीआयने कठोर कारवाई केली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्विसेस लिमिटेडविरोधात कारवाई करताना आउटसोर्स केलेल्या एजंटांकडून कोणत्याही प्रकराची वसूली तातडीने रोखण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे ही कंपनी वसुलीसाठी बाहेरच्या एजंटांचा वापर करू शकणार नाही.
झारखंडच्या हजारीबागमध्ये हा प्रकार घडला होता. यावर आनंद महिंद्रांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. दिव्यांग शेतकरी त्याने घेतलेल्या ट्रॅक्टरचा हप्ता देऊ शकला नव्हता. म्हणून महिंद्राचे वसुलीभाई त्या शेतकऱ्याकडे जबरदस्तीने ट्रॅक्टर ओढून नेण्यासाठी आले होते. यावेळी या वसुलीभाईंनी या शेतकऱ्यांच्या गर्भवती मुलीला चिरडले होते. यात तिचा जागेवरच मृत्यू झाला होता. शेतकरी मिथिलेश मेहता यांनी महिंद्रा फायनान्सकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. याचे हप्ते ते वेळेवर भरू शकले नव्हते.
आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा फायनान्सचे सीईओ आणि एमडी अनिश शाह यांचे ट्विट रिट्विट करताना हजारीबाग दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते आणि पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या. आनंद महिंद्रा यांनी या प्रकरणावरून तिऱ्हाईत एजंटांकडून वसुलीच्या धोरणाचा आढावा घेण्याबाबतही सांगितले होते. तसेच त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.