जळगाव : वैद्यकिय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलेल्या चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या याने पुन्हा मद्यप्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला असून कारागृहात दाखल झाल्यावर त्याने तेथे धिंगाणा घालून रक्षकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी चिंग्याविरुध्द शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील चिंग्याचे मद्यप्राशन प्रकरण घडले होते. तेव्हा तीन पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. आता देखील कैदी पार्टी पोलीस रडारवर आलेले आहेत.
कारागृह रक्षक राहूल राम घाडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चेतन आळंदे उर्फ चिंग्या याच्यासह भगवान लक्ष्मण सुरवाडे या दोघांना शुक्रवारी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी कैदी पार्टी म्हणून मुख्यालयातील पोलीस हवालदार उमेश धनगर व अन्य सहकाऱ्यांची ड्युटी होती. उपचारानंतर सायंकाळी सात वाजता त्याला कारागृहात नेण्यात आले असता मुख्य प्रवेशद्वारावर राहूल घाडके, गुडन तडवी, संजय राठोड, शिवाजी कोसोदे यांची रात्रपाळी ड्युटी होती. चिंग्याला दाखल करुन घेताना त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. कैदी पार्टी पोलीस हवालदार उमेश धनगर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी देखील होकार दिला. त्यामुळे रक्षकांनी त्यास दाखल करुन घेण्यास नकार देत त्याची वरिष्ठ अधिकारी गजानन पाटील व एस.पी.कवर यांना कल्पना दिली. त्यांनी चिंग्याला दाखल करुन घेण्याच्या सूचना देऊन हस्ते म्हणून आपण स्वाक्षरी करतो असे सांगितल्याने चिंग्याला कारागृहात दाखल करुन घेण्यात आले.
२४ तासात तुझे मर्डर करतो
कारागृहात दाखल झाल्यानंतर चिंग्या याने मोठमोठ्याने आरडाओरड करुन रक्षक राहूल घाडके यांना तू मला आतमध्ये उशीरा का घेतले? म्हणत अर्वाच्च शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. २४ तासात तुझे मर्डर करतो, तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करतो, नोकरी घालवतो अशी धमकी दिली. या प्रकारानंतर राहूल घाडके यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन शनिवारी पहाटे चिंग्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.