मनीषा म्हात्रेमुंबई : लहानपणीच आई-वडील विभक्त झाले. आधार ठरलेल्या आजीने कोवळ्या वयातच हात पिवळे करून जबाबदारी पार पाडली. वयाच्या १६ व्या वर्षी मातृत्व तिच्या पदरात पडले. मुलीच्या जन्मानंतर पतीनेही साथ सोडली. आपल्या नशिबी आलेले भोग पोटच्या मुलीच्या नशिबी येऊ नयेत म्हणून नोकरीच्या शोधात तिने कोलकाता गाठले. मात्र, तेथे वेश्याव्यवसायात अडकली. तेथून सुटका होऊन नोकरीच्या आशेने, मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिने मुंबई गाठली आणि येथेही मायानगरी मुंबईच्या रेड लाइट खोलीत ती बंद झाली. बांगलादेशी म्हणून अटकेची भीती घालत डांबून ठेवत दलालांनी तिच्या शरीराचे रोज सौदे केले. अखेर, तिची मुंबई पोलिसांनी या नरकयातनेतून सुटका केली. बांगलादेशमधील दादरा गावात राहणाऱ्या २० वर्षीय रेश्माची (नावात बदल) ही आहे कहाणी. अवघी सात वर्षांची असताना आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. वडिलांसोबत राहत असताना त्यांनीही दुसरे लग्न करून घरातून हाकलून दिले. आजी- आजोबांचा रेश्माला आधार मिळाला. शिक्षणासोबतच शिवणकाम सुरू करून तिनेही आजी-आजोबांना आर्थिक आधार दिला. आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आजीने विवाह लावून देत आपले कर्तव्य पार पाडले. लग्नाच्या पहिल्या वर्षीच मुलगी झाली आणि पतीनेही दुसऱ्या मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून रेश्माला सोडले. लहान मुलगी पदरात असल्याने तिला पुन्हा आजीचा आधार घ्यावा लागला. मुलीच्या चांगल्या संगोपनासाठी ढाका परिसरात कामाच्या शोधात असताना काही महिलांनी तिला चांगले पैसे मिळतील असे सांगत आपल्या सोबत टुरिस्ट पासपोर्टवरून कोलकातामध्ये आणले.
येथे पहिल्यांदा रेश्माला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. मात्र, टुरिस्ट पासपोर्ट संपल्याने या नरकयातनेतून सुटका होऊन ती पुन्हा बांगलादेशला परतली; पण आठवडाभरातच दलालांनी पुन्हा तिला बेकायदा कोलकातामध्ये आणले. दोन वर्षे तेथे वास्तव्यास असताना मैत्रीण माधवी दास हिच्या आई-वडिलांच्या नावाने भारतातील आधार कार्ड बनवून दिले. मुंबईत चांगले काम मिळेल. जास्त पैसे मिळतील, असे सांगून एका महिलेने तिला दलाल सोनू कुमार याच्यासोबत जाण्यास सांगितले. रेश्माने २१ मार्च रोजी मैत्रीण माधवीसोबत मुंबई गाठली.
अखेर अत्याचाराला वाचा फुटलीसंस्थेतील अधिकरी महिलेने तिला विश्वासात घेत चौकशी केली आणि रेश्माने आपल्यावर बेतलेल्या नरकयातनांना आवाज फोडला. संस्थेने ९ डिसेंबर रोजी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, रेश्माच्या तक्रारीवरून कुंटणखाना चालक रवींद्र, अशोक व सोनू कुमारविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करून अधिक तपास सुरू असल्याचे डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी सांगितले.
पळ काढला आणि मागितली मदतसोनू कुमारने तिला नागपाडा येथील एका हॉटेलमध्ये आणून डांबले. पोलीसवाले चेकिंग कर रहे है, सेक्शन गरम है, बांगलादेशी हो, अरेस्ट होगी... असे घाबरवत त्याने रेश्माच्या शरीराची सौदेबाजी सुरू केली. त्यातला एक छदामही रेश्माला दिला नाही. मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी, चांगले काम मिळेल या एका भाबड्या आशेपोटी ती या नरक यातना सहन करत होती. अखेर, बनारस चाळीमधील एका किचनमध्ये काही दिवस डांबल्यानंतर तिने तेथून पळ काढला. पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, खरी ओळख सांगितली नाही. तिच्याकडे कागदपत्रे नसल्याने, तसेच लहान वाटत असल्याने तिला डोंगरी येथील चिल्ड्रन होम येथे नेले, तेथून कांदिवलीतील होम चिल्ड्रनमध्ये ठेवण्यात आले आहे.