उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील एका प्रायमरी शाळेचा शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला. एवढेच नाही, तर त्याने तिला प्रेम पत्रही (love letter) लिहिले. पीडित विद्यार्थिनीने घडलेली संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. यानंतर, पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत न्याय मागितला आहे.
ही घटना कन्नौज सदर कोतवाली हद्दीतील एका गावात घडली आहे. येथील प्रायमरी शाळेत शिकवणारा शिक्षक 8 व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला. तो शिकवण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीसोबत छेडछाडही करत होता. शाळेला सुट्ट्या लागण्यापूर्वी या शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनीला पत्र लिहून प्रेम व्यक्त केले. एवढेच नाही, तर तिला भेटण्यासाठीही बोलावले. या संपूर्ण घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनी गडबडली आणि तिने आपल्या पालकांना पत्र देत संपूर्ण प्रकार सांगितला.
यासंदर्भात बोलताना पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले, की हा प्रकार समजल्यानंतर आम्ही संबंधित शिक्षकाकडे गेलो आणि त्याला माफी मागायला सांगितले. मात्र, त्याने तेथे आमच्यासोबतच वाद घातला आणि आम्हाला हकलून लावले. यानंतर, त्यांनी सदर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.
"पत्र वाचून फाडून टाक, कुणालाही दाखवू नकोस"- "माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. सुट्टीमध्ये तुझी खूप आठवण येईल. मी तुला खूप मिस करेन. तुला फोन मिळाला तर फोन करत जा. शिक्षकासोबतही फोनवर बोलू शकतेस. सुट्टीपूर्वी नक्की मला भेटायला ये आणि प्रेम करत असशील तर नक्की येशील. जर मी तुला 8 वाजता बोलावले तर तू लवकर शाळेत येऊ शकतेस. येणार असशील तर मला सांग. तुझ्यासोबत खूप काही बोलायचे आहे. तुझ्याजवळ बसून एकमेकांना आपलंस करून आयुष्यभरासाठी तुझे व्हायचे आहे. मी कायमच तुझ्यावर प्रेम करेन. पत्र वाचून फाडून टाक आणि कुणालाही दाखवू नकोस," असे शिक्षकाने विद्यार्थिनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.