मुंबई - आपल्यावरील आरोपांची चौकशी पुर्ण होईपर्यत अटक न करण्याची हमी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास भारतात परतण्याची तयारी वादग्रस्त मुस्लिम धार्मिक विचारवंत डॉ. झाकीर नाईक याने दर्शविली आहे. भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास असलातरी भाजप सरकारकडून सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप त्याने एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.डॉ. नाईक याने तीन वर्षापूर्वी भारतातून पलायन केले असून तो मलेशियात स्थायिक आहे. तेथील सरकारने त्याला कायमस्वरुपी रहिवाशाचा दर्जा दिला आहे. बेकायदेशीर पद्धतीने परदेशातून देणग्या गोळ्या केल्याप्रकरणी त्याच्यावर सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) गुन्हे दाखल केले असून त्याची देशभरातील संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणनेकडून(एनआयए) या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.त्याने म्हटले की, पूर्वीच्या शासन काळात तुम्ही जर सरकार विरोधात बोलत असाल तर तुम्हाला किमान ८० टक्के न्याय मिळण्याची हमी होती. आता भाजपा राजवटीत त्याचे प्रमाण १० ते २० टक्यावर आले आहे. यापुर्वीच्या घटना पाहिल्यास दहशतवादी घटनामध्ये अटक केलेल्या मुस्लिमापैकी ९० टक्के निरपराध तरुणांचा १० ते १५ वर्षे जाणीवपूर्वक छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले असून मी गेल्यास १० वर्षासाठी मला व माझ्या अभियानावर अडथळा आणला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनआयए मला मलेशियात प्रश्न विचारु शकते. जर सर्वोच्च न्यायालयाने अटक न करण्याची हमी दिल्यास मी भारतात हजर होवून माझे निर्दोषत्व सिद्ध करेन.बांग्लादेशात ढाका येथे १ जुलै २०१६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या आरोपींनी डॉ. झाकीर नाईक याच्या भाषणाने प्रभावित झाल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून तपास यंत्रणांनी त्याच्यावर फास आवळला असून मुंबईतील डोंगरी येथील इस्लामिक रिसर्च फाउंडेशन(आयआरएफ) मुख्यालयासह देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून कार्यालये व मालमत्ता जप्त केली आहे. अवैध मार्गाने परदेशातून देणग्या मिळविणे, आणि देशविरोधी कृत्ये करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने त्याला आंतरराष्ट्रीय फरारी आरोपी घोषित करण्यााबाबतचा प्रस्ताव युनोने फेटाळून लावला आहे.त्याबाबत बोलताना नाईकने सांगितले की, मी कोणालाही दहशतवादाचा अवलंब करण्यास , निष्पापांना मारण्यास सांगितलेले नाही, की प्रेरणा दिलेली नाही. जर कोणी असे सांगत असल्यास तो खोटे बोलत आहे. मनी लॉँड्रिंगबाबतचे आपल्यावरील लावलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्याने केला. माझ्या बऱ्याच कंपन्या असून मी रिअल इस्टेट आणि अन्य व्यवसाय करीत आहे. जर अंमली पदार्थ किंवा दहशतवादासाठी काम करीत राहिलो असतो तर युएस आणि अन्य राष्ट्रांनी माझ्या चॅनेलला मान्यता दिली नसती.
सर्वोच्च न्यायालयाने हमी दिल्यास भारतात परतण्यास तयार - डॉ. झाकीर नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:49 PM
अटक न करण्याची हमी
ठळक मुद्दे राष्ट्रीय तपास यंत्रणनेकडून(एनआयए) या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.जर अंमली पदार्थ किंवा दहशतवादासाठी काम करीत राहिलो असतो तर युएस आणि अन्य राष्ट्रांनी माझ्या चॅनेलला मान्यता दिली नसती.