मुंबई - मुंबईचे माजी आयुक्त संजय बर्वे यांनी निवृत्तीच्या दोन दिवसापूर्वी जारी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत फेरविचार करुन निर्णय घेतला जाईल, असे नवे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. शनिवारी पदभार घेतल्यानंतर काही तासामध्ये त्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक गरजेशिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नयेत, असा संकेत आहे. मात्र बर्वे यांनी २७ फेबु्रवारी शहर व उपनगरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या एकुण ३० अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येकी ४ सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश होता. त्याशिवाय सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या १७ निरीक्षकांना विविध पोलीस ठाणे व शाखामध्ये नियुक्ती दिली होती. मात्र शनिवारी या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली. त्याबाबत बोलताना आयुक्त परमबीर सिंग म्हणाले,‘या बदल्या कोणत्या उद्देशाने केल्या गेल्या याबाबत माहिती घेतली जात आहे. त्याच्या आढाव्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे, प्रशासकीय बाब असल्याने त्याबाबत सध्या अधिक बोलू शकत नाही.’