लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले. दरम्यान, न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे.
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तपासात बाळ बोठे याचा सहभाग आढळल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्टँडिंग वॉरंट काढल्यानंतरही बोठे मिळून न आल्याने त्यास फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम ८२ प्रमाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. १ मार्चच्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर गुरूवारी न्यायालयाने अंतिम आदेश दिला.
बोठेचा जाहीरनामा प्रसिद्धन्यायालयाने बोठेला फरार घोषित करण्याचा आदेश जारी केल्यानंतर पोलिसांनी बोठेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस आता अधिकारात असलेल्या सर्व प्रक्रिया राबविणार आहेत. यामध्ये आरोपीचा फोटो असलेले प्रसिद्धीपत्रक जारी करणे, पोस्टर तयार करून विविध ठिकाणी चिकटविणे, आरोपीबाबत माहिती सांगण्यासंदर्भात जनतेला आवाहन करणे आदी प्रक्रिया पोलिसांकडून राबविली जाऊ शकते.दरम्यान, जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दखल केले आहे. बोठेच्या अटकेनंतर त्याच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.बोठेच्या मालमत्तेची पोलिसांकडे कुंडलीबोठे पोलिसांना सापडला नाही अथवा तो स्वतःहून हजर झाला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची परवानगी न्यायालयाकडून पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आधीच बोठे याच्या मालमत्तेची माहिती घेऊन ठेवली आहे.
नगर - पुणे महामार्गावर जातेगाव घाटात ३० नोव्हेंबरला जरे यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची सुपारी बोठे यानेच दिल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. सर्वत्र शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाने त्याच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बोठे ९ एप्रिलपर्यंत स्वतःहून पोलिसात हजर झाला नाही तर त्याच्या मालमत्ता जप्ती संदर्भातील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.