अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयात ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोठे याने न्यायालयात ॲड. महेश तवले यांच्या माध्यमातून सोमवारी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमाेर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जामीन अर्जावर सरकारी वकील व तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे मागविले आहे. म्हणणे आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. जरे यांच्या हत्याकांडात बोठे याचे नाव समाेर येताच तो नगर शहरातून पसार झाला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. बोठे हॉटेल, लॉजमध्ये लपल्याची शक्यता गृहीत धरत पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत शिर्डीसह नाशिक व इतर शहरांत शोध घेतला. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत आहे. बोठे याला कोण मदत करू शकते याचा अंदाज घेत पोलिसांनी त्याच्या मित्र व जवळच्या व्यक्तींवरही लक्ष केंद्रित केले आहे.
लाचलुचपतमार्फत स्वतंत्र चौकशी करा : ॲड. लगड मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याकडे असलेल्या ज्ञात, अज्ञात संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत स्वतंत्र चाैकशी करावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. बोठेच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करून त्याची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर झालेली नियुक्तीही रद्द करावी, असे लगड यांनी म्हटले आहे.