मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट कायम असताना, नक्षलग्रस्त भागातून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांचे कॉल सेंटर उद्ध्वस्त करून ५ जणांना अटक करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी उच्चशिक्षित असून त्यात बी.ई., बी.टेक्. झालेल्यांचा समावेश आहे. या टोळीने आतापर्यंत २१० जणांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले. हा आकडा जास्त असून, त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.
धनंजय ऊर्फ रामबरण पंडित (वय २०), शरवण ऊर्फ कौशल पासवान (२९), धर्मजय कुमार ऊर्फ कारू प्रसाद (२९), नितीश कुमार ऊर्फ मिथिलेश प्रसाद (२७), सुमंत कुमार ऊर्फ शत्रुघ्न प्रसाद (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच संतोष कुमार, सूरज कुमार आणि सूरज कुमार ऊर्फ गोलू यांचा शोध सुरू आहे.
गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीत राहणारे डॉक्टर आबासोा चव्हाण (४२) यांची रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, तर दुसरीकडे सिप्ला कंपनीच्या नावाने देशभरात अशाप्रकारे शेकडो जणांची फसवणूक केेल्याचे मेल कंपनीला आले. कंपनीकडूनही पोलिसात तक्रार देण्यात आली. त्याबाबतही गुन्हा नोंद आहे.
याचआधारे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात, सिप्ला कंपनीच्या नावाने ट्वीटर अकाैन्ट बनावट खाते तयार करून त्याखाली वेगवेगळ्या बँक खात्यांसह मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आल्याचे दिसून आले.
तसेच ही मंडळी रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमॅब औषध, ऑक्सिजन, प्लाझ्मा मिळवून देण्याच्या नावाखाली असलेल्या जाहिरातींना बळी पडलेल्या नागरिकांकडून पैसे उकळत होती. कत्रीसराय, बिहार शरीफ, तसेच वारसलिंगज या नक्षलग्रस्त भागातून ही टोळी काम करत असल्याची माहिती मिळताच पथक बिहारला रवाना झाले. शरीफ या भागात असलेले कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. वारसलिंगज येथून मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या. तसेच अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींकड़ून १८ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले आरोपी हे उच्चशिक्षित आहेत. गेल्या वर्षभरापासून ते फसवणूक करत आहेत.
आधी बजाज फायनान्सच्या नावाने लोकांना घातला गंडा - यापूर्वी या मंडळींनी बजाज फायनान्सच्या नावाचा वापर करून कर्जपुरवठा करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. - लॉकडाऊनच्या काळामध्ये बजाज फायनान्सच्या नावाने फायदा होत नसल्याने त्यांनी कोरोना उपचाराकरिता लागणाऱ्या सुविधा पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू केल्याचे चौकशीत समोर आले.
१०० सिम कार्ड जप्त- सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात समोर आलेल्या माहितीत आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावर सुमारे दहा ते पंधरा हजार फोन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून १०० सिम कार्ड जप्त करण्यात आली असून, ही सिम कार्ड पश्चिम बंगाल येथून पुरवली जात असल्याची माहिती मिळाली आहे.- ही मंडळी ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून लोकांना ऑक्सिजन बेड मिळवून देण्याकरिता सिप्ला कंपनीच्या नावाने जाहिरात करत होते. - त्यामध्ये संपर्क करता मोबाइल नंबर देऊन, दिल्ली, मुंबई, पुणे, जयपूर, हैदराबाद इत्यादी ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचे नमूद करत होते. - संपर्क साधून पैसे भरल्यानंतर आरोपी मोबाइल बंद करत होते. आरोपींनी बनावट पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर करत ३२ बँक खाती उघडल्याचे समोर आले. या ठगांनी आतापर्यंत ६० लाखांची कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.