औरंगाबादमध्ये भाजपाचे आमदारप्रशांत बंब आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. कारण संचारबंदीमध्ये बंब यांच्या नातेवाईकाची गाडी अडवली. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या प्रशांत बंब यांनी पोलिसांना गाडी का अडवली अशी विचारणा केल्यानंतर वाद वाढला.
ब्रेक द चेनअंतर्गत संपूर्ण राज्यात सरकारनं संचारबंदी आणि कडक निर्बंध लावलेले आहेत. त्यानुसार राज्यात कलम १४४ लागू केलेलं असल्यानं विनाकारण शहरात फिरण्यास सर्वांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून लोकांनी विनाकारण फिरू नये म्हणून कारवाई करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी औरंगाबाद शहरात महात्मा फुले चौकात एका तरुणाला अडवलं. त्यावर या तरुणाने कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाला काही वस्तू देण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला आणखी विचारपूस केली आणि त्याच्यावर कारवाई केली.
दरम्यान तरुणाने फोन करून आमदार प्रशांत बंब यांना घटनास्थळी बोलावून घेतलं. यानंतर प्रशांत बंब त्याठिकाणी आले आणि त्यांनी पोलिसांबरोबर वाद घालत जाब विचारायला सुरुवात केली. तरूण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाला भेटायला जात होता, त्याला का अडवले असा सवाल प्रशांत बंब यांनी केला. अशाप्रकारे पोलीस लोकांना अडवू शकत नाही, असंही बंब म्हणाले. मात्र पोलिसांनी तरुणावर संशय आल्याने कारवाई केल्याचं स्पष्टपणे सांगितलं. त्यावरुनही बंब आणि पोलिसांत वाद झाला. संबंधित तरुण हा बंब यांचा नातेवाईक होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
पोलीस आणि बंब यांच्यात पेटला वाद
पोलीस ऐकत नसल्यामुळे बंब याचा पारा चांगलाच चढला होता. लोक मरतायेत, व्हेंटिलेटर नाही, आक्सिजन नाही, सगळीकडे भयानक परिस्थिती आहे. तरीही पोलिस रुग्णाच्या नातेवाईकाशी असे कसे वागू शकता? असा सवाल त्यांनी केला. हा तरुण खरंच आपल्या नातेवाईकाला पाणी आणि बिस्कीट द्यायला जात आहे. तो सांगतोय, त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा शहानिशा करा, असे म्हणत बंब आक्रमक झाले.तर दुसरीकडे पोलिस अधिकारी देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बराच वेळ दोघांमध्ये वादावादी सुरु होती, तेव्हा काही प्रत्यक्षदर्शीनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तरुणाला सोडून देण्यात आले आणि आमदार बंब देखील तिथून निघून गेले.