मुंबई : ठाणे पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याअंतर्गत २० मे पर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना अटक करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. परमबीर यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्याचं प्रकरण असून हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २० मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अकोल्याच्या एक पोलिसाने परमवीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यासंदर्भात तपास सुरू झाला आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्या. पी.बी. वराळे व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाला दिली. सिंग यांना पोलीस २० मे पर्यंत अटक करणार नाहीत. तोपर्यंत राज्य सरकार त्यांच्या याचिकांवर उत्तर दिले, असे खंबाटा यांनी म्हटले.
सिंग यांच्यावर ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, असे खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. तोपर्यंत आम्ही (पोलीस) याचिकाकर्त्यांना (परमवीर सिंग) यांना अटक करणार नाही, असे खंबाटा यांनी म्हटले. न्यायालयाने त्यांचे हे विधान स्वीकारत या याचिकेवरील पुढील सुनावणी २० म रोजी ठेवली. दरम्यान, न्यायालयाने तक्रारदारालाही सुनावले. ही घटना २०१५ मध्ये घडली आणि २०२१ मध्ये तुम्ही तक्रार करता? असा सवाल न्यायालयाने केला.
भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणी परमबीर सिंग यांनी अडकविले होते. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचविण्यास परमबीर सिंग यांनी घाडगे यांना सांगितले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नाही, असे सांगत घाडगे यांनी परमबीर सिंग यांना नकार दिला होता. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांना निर्दोष सोडले होते.
घाडगे दांपत्याचे अंडा सेलमध्ये सव्वा वर्ष परमबीर सिंग यांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. एवढेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे किंवा आतंकवादी असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारगृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसताना घाडगे आणि त्यांच्या पत्नीने एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये घालविले.
२७ पोलीस अधिकारी जाळ्यात...मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.