नागपूर : कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी भटकंती करीत असतानाच नागपूर शहर पोलीसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. यात डॉक्टरसह तीन वार्डबॉयला अटक करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत होता. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली होती. पोलीस आयुक्तांनी गांभिर्याने घेऊन अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते. काळाबाजारीवर लक्ष ठेवून असलेल्या पोलीसांना कामठीमध्ये आशा हॉस्पीटलचे डॉ. लोकेश साहू यांच्याकडे १६ हजार रुपयात एक रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. पोलीस आयुक्तांनी झोन ५ चे डीसीपी निलोत्पल यांना कारवाईचे निर्देश दिले. निलोत्पल यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून डॉ. साहू यांच्याशी संपर्क केला. डॉ. साहू ने दोन रेमडेसिविर असल्याचे सांगितले. डमी ग्राहकाला डिलीव्हरी करताना पोलीसांनी डॉ. साहू याला अटक केली. त्याची चौकशी केल्यावर प्रतापनगर येथील स्वस्थम हॉस्पीटलमधील दोन वार्डबॉय जवळ रेमडेसिविर असल्याचे सांगितले.
निलोत्पल यांनी स्वस्थम हॉस्पीटलच्या वॉर्ड बॉयशी संपर्क साधला. ते सुद्धा रेमडेसिविरची विक्री करण्यास तयार झाले. त्यांनासुद्धा रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७ इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्यांची कसून चौकशी करीत असताना हिंगणा येथील शालिनीताई मेघे हॉस्पीटलमध्ये एक वॉर्डबॉय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा खुलासा झाला. पोलीसांनी शालिनीताई मेघे हॉस्पीटलच्या त्या वॉर्डबॉयला सुद्धा ताब्यात घेतले. त्याच्याकडे ६ इंजेक्शन मिळाले. पोलीस पथक रात्री उशीरापर्यंत डॉ. साहू व तीन वॉर्डबॉयची चौकशी करीत होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले की आरोपींच्या चौकशीत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारीचा मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीसांकडून कसून चौकशी सुरू आहे.- रुग्णांना इंजेक्शन लावण्यात येत नाही
सुत्रांच्या माहितीनुसार रॅकेटमध्ये डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. कोरोना वार्डात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. याचा फायदा घेत कर्मचारी रेमडेसिविरची चोरी करतात. ज्या रुग्णाच्या नावावर इंजेक्शन मागविण्यात येते, त्याला लावण्यात येत नाही. इंजेक्शनची काळाबाजारी करून त्याला १० ते २० हजारात विक्री करतात. या रॅकेटची कसून चौकशी केल्यावर अनेक खुलासे होवू शकतात.