लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी माफीचा साक्षीदार असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने तुरुंगाबाहेर पडण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बुधवारी सीबीआयला व तळोजा कारागृहाला त्याच्या या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
माफीचा साक्षीदार होऊनही आपल्याला तुरुंगातच ठेवण्यात आले आहे. उलट या प्रकरणातील आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याआधी दोनदा विशेष सीबीआय न्यायालयाने सीआरपीसी कलम ३०६ (४) (बी) चा हवाला देऊन त्यांनी जामीन फेटाळला, असे वाझे याने याचिकेत म्हटले आहे.
२ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात
वाझेवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही आणि दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. तो माफीचा साक्षीदार असल्याने त्याच्यावर आरोपपत्र नाही आणि तो साक्षीदार असल्याने त्याला या प्रकरणात शिक्षाही होणार नाही, असे वाझेच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. खटला संपेपर्यंत माफीच्या साक्षीदाराला तुरुंगातच ठेवण्यासंदर्भात ही तरतूद आहे. माफीचा साक्षीदाराला शिक्षा देण्यासाठी ही तरतूद नाही. परंतु, त्याने ज्या आरोपींचे कृत्य उघडे करायचे ठरविले आहे, त्यांच्यापासून त्याला संरक्षण देण्यासाठी ही तरतूद आहे, असे न्यायालयाने म्हटले.