Shraddha Murder Case: महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब आमीन पुनावाला याने तिची आधी हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना उघडकीस आली. श्रद्धा वालकर (Shraddha Walker) ही तरूणी आफताब बरोबर दिल्लीमध्ये वास्तव्यास होती. त्यावेळी आफताबने (Aaftab Poonawala) तिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पण याच दरम्यान, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबसोबत दिल्लीत असताना आपल्या जीवाला धोका आहे, असा अंदाज श्रद्धाला आधीच आल्याचे तिच्या एका मित्राने सांगितले.
श्रद्धा ही २६ वर्षीय तरुणी होती. तिचे मुंबईत आफताबशी प्रेम जुळले. त्यानंतर ते दोघे दिल्लीला शिफ्ट झाले. तेथे श्रद्धाने आफताबकडे लग्नासाठी हट्ट धरला. त्या हट्टाला कंटाळून त्याने दिल्लीत तिचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर जंगलातल्या वेगवेगळ्या भागांत फेकले, असा खुलासा पोलिस तपासा झाल्याचे सांगण्यात येत आले. पण श्रद्धाच्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, आफताब श्रद्धाला दगाफटका करू शकतो असा श्रद्धाला आधी संशय आला होता.
मित्राने केला धक्कादायक खुलासा
श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याने सांगितले, "श्रद्धाचा एके दिवशी मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की तिला त्या घरातून बाहेर निघायचे आहे. जर त्या रात्री ती आफताब बरोबर त्या घरात राहिली तर तो तिला मारून टाकेल. मला श्रद्धाची काळजी वाटली. मी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न जुलैपासून करत होतो. तिच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. तिचा फोनदेखील स्विच ऑफ होता. अखेर तिच्या काही मित्रांकडे चौकशी केल्यानंतर मी तिच्या भावाला फोन केला आणि आम्ही पोलिसात गेलो."
अफताब श्रद्धाला मारहाण करायचा!
"श्रद्धा आणि आफताब हे दोघे २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरूवातीच्या काळात त्यांच्यात खूप प्रेम होतं. ते दोघे अतिशय सुखात आणि आनंदी राहत होते. पण नंतर श्रद्धाने सांगितले की आफताबने तिला मारहाण करायला सुरूवात केली. तिला आफताबला सोडून वेगळं व्हायचे होते, पण तिला ते काही कारणामुळे जमलं नाही. अखेर ते लोक नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला शिफ्ट झाले," अशी माहिती श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याने दिली.