लोकमत न्यूज नेटवर्क, पडघा: भिवंडी तालुक्यातील मैंदे गावाजवळ शेंडेपाडा येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या ११ कुटुंबांतील तब्बल २४ वेठबिगार मजुरांची सुटका करण्यात आली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि कार्यकर्त्यांनी छापा टाकत येथील मालकाच्या दहशतीखाली असलेल्या या मजुरांना गुलामगिरीतून मुक्त केले. यात १८ बालकांचा समावेश आहे.
घटनास्थळी महसूल विभाग आणि पोलिसांना कळवून मजूर राजेश दशरथ मुकणे यांच्या फिर्यादीनुसार मालक शशिकांत पाटील याच्याविरुद्ध पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वीटभट्टी मालक पाटील याच्याकडून राजेश याने गेल्यावर्षी २० हजार रुपयांचा बयाणा घेतला होता.
यानंतर राजेश याने गेल्यावर्षी शेंडेपाडा (मैंदे) येथे त्यांच्या वीटभट्टीवर विटा थापण्याचे काम केले. राजेशची पत्नी मीना गरोदर असल्याने बाळंतपण करताना तिचे सिझेरियन झाले तेव्हा ३२ हजार रुपये खर्च केल्याचे मालकाने राजेश याला सांगितले.
वीटभट्टीवर वेठबिगारीकरिता जुंपले
एकूण ५२ हजार रुपये राजेश आणि कुटुंबाच्या अंगावर मालकाने लावले होते. बदल्यात पाटील यांनी राजेश व त्याच्या पत्नीला आपल्या वीटभट्टीवर वेठबिगारीकरिता जुंपले. यावेळी अमानुष वागणूक देणे तसेच मारहाणही करण्यात आली. मालकाचा अन्याय सहन न झाल्याने राजेश कामावर जायला तयार नव्हता, म्हणून त्याने इतर एका मालकांकडून उचल घेत शशिकांत यांचे पैसे परत देण्याची तयारी दाखवली. मात्र, ‘तुला माझ्याकडेच कामाला यावे लागेल. तुझ्या अंगावर माझे पैसे आहेत. कसा येत नाही ते मी पाहतो. तू आताच्या आता गाडीत बस’ असे सांगितले.