राजकुमार जाेंधळे / लातूर : जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून अपरहण केलेल्या दाेघा मुलींची हैदराबाद शहरातून अनैतिक मानवी ववाहतूक प्रतिबंधक (एएचटीयू) शाखेच्या पथकाने सुटका केली. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विशेष माेहीम राबवत मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
पाेलिसांनी सांगितले, दीड वर्षांपूर्वी १७ वर्षीय दाेघा अल्पवयीन मुलींना अज्ञाताने आमिष दाखवून पळून नेल्याची घटना घडली हाेती. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे आणि देवणी पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान, गत दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर पाेलिस ठाण्याकडून संबंधित पीडित मुलींचा शोध सुरू होता. मात्र, त्यांचा शाेध लागत नव्हता. जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर, देवणी ठाण्याच्या पाेलिसांकडून समांतर तपास करण्यात येत होता. एएचटीयू शाखेला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने या दाेन अल्पवयीन मुली हैदराबाद येथे असल्याची माहिती समाेर आली. त्यांचा हैदाराबाद शहरात शाेध घेण्यात आला. दाेन दिवसांच्या शाेधानंतर दाेन मुलींसह त्यांच्यासोबत दाेघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या पीडित मुलीसह दाेघा आरोपींना उदगीर आणि देवणी पाेलिस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई लातूर येथील एएचटीयू शाखेच्या पोलिस निरीक्षक बबिता वाकडकर, पोलिस उपनिरीक्षक श्यामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुधामती यादव, लता गिरी, निहाल मणियार यांच्या पथकाने केली.