लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शनिवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केली. यादरम्यान अधिकाऱ्याच्या पत्नीने चोरट्यांना विरोध केल्यामुळे तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रायबरेलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये डीएम आणि अलाहाबादमधील विभागीय आयुक्त राहिलेले 71 वर्षीय सेवानिवृत्त आयएएस अधिकारी डीएन दुबे लखनौच्या इंदिरानगर पोलिस स्टेशन क्षेत्रातील सेक्टर-22 मध्ये राहतात. शनिवारी सकाळी गोल्फ खेळून ते परत आले, तेव्हा घरातील सर्व सामान विस्कटलेले दिसले. तसेच, पत्नी मोहिनी हिचा मृतदेह जमिनीवर पडला होता. तिच्या गळ्यात फास बांधला होता. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आसपासच्या लोकांची चौकशी सुरू आहे.