नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे विविध फंडे वापरून नागरिकांना गंडा घालण्यात येत आहे. एका सायबर ठगाने चक्क देशातील नामांकित कंपनी हल्दीरामच्या नावावरच एक सेवानिवृत्त व्यक्तीला गंडा घातला. हल्दीराममध्ये गुंतवणूकीची बतावणी करत आरोपी फसवणूक केली. संबंधित व्यक्तीने खातरजमा करण्यासाठी हल्दीरामच्या मालकांना संपर्क केल्यावर या प्रकाराचा भंडाफोड झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजीवकुमार मधुसूदन उर्फ मारोतराव खरात (५८, मेश्राम ले आऊट) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते ऑगस्ट महिन्यात एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले. सेवानिवृत्त होण्याअगोदरच त्यांनी पुढे व्यवसाय करण्याच्या दृष्टीने शोधमोहीम सुरू केली होती. १ नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑनलाईन सर्च करत असताना त्यांना हल्दीराम फूड इंटरनॅशनल प्रा.लि.च्या नावाने एक ऑनलाईन जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत दिलेल्या संकेतस्थळाला उघडले असता त्यावर रोहीत अग्रवाल नावाच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक होता.
खरात यांनी ८६५१९९६९७८ या क्रमांकावर संपर्क केला असता तथाकथिक अग्रवालने हल्दीरामला नागपुरात व्यवसाय वाढवायचा असून एजन्सी हवी असेल तर स्वत:च्या मालकीची जागा, पक्के बांधकाम लागेल असे सांगितले. त्याने नोंदणी शुल्काच्या नावाखाली खरात यांना ४९ हजार ८०० रुपये त्याने दिलेल्या बॅंक खात्यात युपीआयच्या माध्यमातून पाठविले. त्यानंतर खरात यांनी त्याला संपर्क केला असता त्याने दुसऱ्याच दिवशी सात लाखांचा माल खरेदी करावा लागेल असे सांगितले. तर सात दिवसांत माल खरेदी केला नाही तर नोंदणी शुल्क परत देऊ असेदेखील त्याने सांगितले.
दरम्यान, खरात यांनी हल्दीरामचे मालक सुशील अग्रवाल यांचा मोबाईल क्रमांक मिळविला व त्यांना संपर्क केला. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर खरात यांनी नोंदणी शुल्क भरल्याचा स्क्रीन शॉट पाठविला. अग्रवाल यांनी संबंधित प्रकार हा फसवणूकीचा असून समोरील व्यक्तीला आणखी पैसे पाठवू नका असे स्पष्ट केले. या प्रकारानंतर खरात यांनी अखेर बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तथाकथिक रोहीत अग्रवाल असे नाव सांगणाऱ्या सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.