मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात दोन्ही समर्थकांमध्ये वॉर सुरु आहे. अशातच एका माजी नौदलाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. कांदिवली येथे राहणाऱ्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ६५ वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.
शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. यानंतर कमलेश कदम नावाच्या व्यक्तिचा मला फोन आला. त्यांनी माझं नाव आणि पत्ता विचारला. दुपारी ते लोक बिल्डींग खाली आले त्यांनी मला खाली बोलावलं. बिल्डींगच्या गेटवर ८ ते १० जणांनी मला बेदम मारहाण केली. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी याबाबत समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कमलेश कदमसह ८ ते १० जणांवर कलम ३२५, १४७, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कमलेश कदमसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत. या गुंडावर कठोर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कंगना राणौत वादावरुन महाविकास आघाडीचं मौन
अभिनेत्री कंगना रणौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाबाबत कोणतेच भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवसेनेने कंगनासोबत संघर्षाचा पवित्रा घेतल्याने विनाकारण वादंग निर्माण होत असल्याची भावना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त झाली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सूचकपणे सबुरीचा सल्ला दिला. या साऱ्या घडामोडीनंतर शिवसेनेने या प्रकरणी आता कोणतेच विधान करायचे नाही, अथवा जाहीर भूमिका घ्यायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. कंगनाने मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली असतानाही संजय राऊत यांनी यावर बोलण्यास नकार दिला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज असल्याची अफवा माध्यमांनी पसरवू नये, असे काहीही घडलेले नाही. कंगना रणौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही ते विसरुन गेलो. ती काय ट्विट करते, ते वाचले नाही. आम्ही फक्त सामना वाचतो, असं संजय राऊत म्हणाले होते.
काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांना न बोलण्याच्या सूचना
कंगना रणौतप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी अथवा प्रवक्त्यांनी कोणतेही विधान करू नये. कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या फंदात पडू नये. यासंदर्भातील वाहिन्यांवरील चर्चेतही जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या आहेत. स्वत: पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीच या प्रकरणी काँग्रेस नेत्यांना न बोलण्याचे फर्मावल्याची चर्चा प्रदेश नेत्यांमध्ये होती. विशेषत: वाहिन्यांवरील चर्चेत अथवा माध्यमांशी बोलणाऱ्या नेत्यांनी हायकमांडच्या सूचनेनंतर मौन बाळगणे पसंद केले आहे.