लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टेलिकॉम कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या ७० वर्षीय अधिकाऱ्यासह एका खासगी कंपनीच्या मुख्य महाव्यवस्थापकाला थकीत वीज बिलाच्या नावाने एकूण ८ लाखांना गंडविण्यात आले आहे. याप्रकरणी चेंबूर आणि समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
चेंबूरच्या खासगी कंपनीत मुख्य महाव्यस्थापक असलेल्या ५७ वर्षीय तक्रारदार यांना १२ जानेवारी रोजी थकीत बिल न भरलतेमुळे वीज पुरवठा खंडित होणार असल्याबाबत संदेश आला. त्यांनी, तत्काळ संबंधित क्रमांकावर कॉल करून बिल भरले असल्याचे सांगितले. कॉलधारकाने बिल अपडेट झाले नसून त्यासाठी क्यूआर ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडून त्यावरून १ रुपयाचा व्यवहार करण्यास सांगितले. त्यांनी, पैसे पाठवताच, मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक शेअर करण्यास सांगितले. त्यानंतर, त्यांच्या खात्यातून पैसे वजा होण्यास सुरुवात झाली. अवघ्या काही तासांतच खात्यातून ३ लाख ४७ हजार रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यवहार थांबवले.
दुसऱ्या घटनेत कांदिवली परिसरात राहणारे ७० वर्षीय तक्रारदार यांना २ जानेवारी रोजी थकीत वीज बिलाचा संदेश आला. त्यांनी, संपर्क करताच कॉलधारकाने क्विक सपोर्ट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. १२ रुपयांचे व्यवहार करण्यास सांगून खात्यातील ४ लाख ७३ हजार रुपयांवर हात साफ केला. त्यानंतर, कॉलधारक नॉट रिचेबल झाले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, समतानगर पोलीस अधिक तपास करत आहे.