बीड : साडेअठरा लाखांची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याप्रकरणी महावितरणचे सेवानिवृत्त अभियंता हरिभाऊ कुंडलिक घुले, त्यांची पत्नी आणि दोन मुलांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या घटनेने एकच खळबळ उडली असून सेवानिवृत्तीनंतरही भ्रष्टाचाराच्या पापाचे भूत कधीही मानगुटीवर बसू शकते, या धास्तीने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता हरिभाऊ कुंडलिक घुले यांनी वाममार्गाने संपत्ती गोळा केली असल्याची तक्र ार बीड एसीबीला प्राप्त झाली होती. या तक्र ारीची गांभीर्याने दखल घेत बीड एसीबीने चौकशी सुरु केली होती. चौकशी दरम्यान घुले यांच्याकडे ज्ञात आणि कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा १८ लाख ३८ हजार ९७३ एवढी बेहिशोबी संपत्ती आढळून आली. ही मालमत्ता संपादित करण्यासाठी घुले यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि दोन मुले अजित आणि अमर यांनी सहाय्य केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.
याप्रकरणी बीड एसीबीच्या फिर्यादीवरून हरिभाऊ घुले, लक्ष्मीबाई घुले, अजित घुले आणि अमर घुले (सर्व रा. टाकळी, ता. केज, ह.मु. एन-३, सिडको, औरंगाबाद) या चौघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, निरीक्षक गजानन वाघ आणि कर्मचारी तसेच औरंगाबादच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी पार पाडली.
बीड जिल्ह्यातील पहिला गुन्हासेवानिवृत्तीनंतरही उच्चपदस्थ अधिकाऱ्यासह कुटुंबियावरही गुन्हे दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अशा प्रकारे चौकशी करून निवृत्त अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा एसीबीने केला आहे.
घराची झाडाझाडतीगुन्हा दाखल होताच पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हणपुडे पाटील यांच्यासह पथकाने घुले यांच्या मुळ गावी असलेल्या घराची झडती घेतली. तसेच काही लोकांकडून माहितीही गोळा केल्याची सुत्रांकडून सांगण्यात आले. उशिरापर्यंत बीड एसीबी टिम केजमध्ये तळ ठोकून होते.