नालासोपारा (मंगेश कराळे) :- मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे ८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने प्रवाशाला परत करण्यात माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. माणिकपूर पोलिसांनी ही माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वसईच्या दिवाणमान येथील मयुरी सोसायटीत राहणारे सुरेशकुमार अर्जुनदास गुप्ता (५४) हे त्यांचे पत्नीसह ५ डिसेंबरला मुंबईच्या मालाड येथून वसईला ओला कॅबने निघाले होते. या प्रवासा दरम्यान त्यांच्याकडे असलेली ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे ८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग ओला कॅबमध्ये राहिली. त्यांनी बॅग गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी माणिकपुर पोलीस ठाण्यात घटनेबाबत माहिती दिली होती. सदर बाबत माणिकपुर पोलिसांनी मिसिंग दाखल केली.
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या सुचनेनुसार माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ दिवाणमान परिसरात शोध घेवून तेथील परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. रोख रक्कम च दागिने ठेवलेली बॅग ही ते ओला कारमधून उतरत असतांना दिवानमान परिसरात पडल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. ती बॅग एक जण उचलताना दिसून आल्याने त्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तसेच बातमीदार यांचे मदतीने शोध घेतला. सुरेशकुमार यांची गहाळ झालेली रक्कम व दागिन्यांबाबत कौशल्याने विचारपूस करुन त्यांची गहाळ झालेली रोख रक्कम व ८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून त्यांना परत केले.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले/श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बड़े, वरिष्ट पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद साबळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) ऋषिकेश पवळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविद लवटे, आनंदा महादेव, प्रषिण कांदे यांनी केली आहे.