ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांना तावडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या नावाने फोन सचिन वाझे यांनीच केला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांचा काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळला. आता मनसुख हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. या तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हत्येच्या आदल्यादिवशी म्हणजेच ४ मार्चला मनसुख यांना तावडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने फोन केल्याचे मनसुख यांच्या पत्नीने माहिती दिली. मात्र हा फोन सचिन वाझे यांनीच तावडे नावाने केला होता, अशी माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे.
४ मार्चला मनसुख यांना तावडे नावाच्या एका कांदिवली गुन्हे शाखेतील पोलिसांचा फोन आला आणि त्याने घोडबंदर येथे त्यांना भेटायला बोलावले. त्यानुसार मनसुख घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर मनसुख यांचा मोबाईल बंद झाला आणि ते गायब झाले होते. सुरुवातीला एटीएस या प्रकरणाचा तपास करत होतं. त्यावेळी सचिन वाझे यांचा साथीदार निलंबित पोलीस विनायक शिंदे याने तावडे नावाच्या अधिकाराच्या नावाने मनसुख यांना ४ मार्चच्या रात्री फोन केला होता आणि त्याची हत्या केली होती. पण आता तपासात जी माहिती समोर आली आहे ती खळबळजनक आहे.
तांत्रिक पुराव्याच्या आधारे NIA ने दावा केला की, ४ मार्चच्या रात्री मनसुख जेव्हा त्याच्या दुकानातून घरी गेले आणि घरी जेवत असताना म्हणून मनसुखला Whats App कॉल आला होता. त्यानुसार मनसुखने त्याच्या पत्नीला सांगितले होते की, एका तावडे नावाच्या कांदिवली क्राइम ब्रांचच्या पोलिसाने फोन केला होता आणि अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी चौकशी करायची आहे. त्यामुळे मी त्या तावडे नावाच्या पोलिसाला घोडबंदर येथे भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने ४ मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते. हे सर्व मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
मात्र, ४ मार्चच्या रात्री मनसुख यांना फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझेच होता आणि सचिन वाझे यांनी Whats App कॉलच्या माध्यमातून मनसुख यांना घराखाली बोलावून घेतले होते, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. नंतर सचिन वाझे यांनी मनसुख यांना त्याच्याच काही माणसांच्या हवाली केले. त्यानंतर मनसुख बेपत्ता झाले आणि ५ मार्चच्या सकाळी १०. ३० च्या सुमारास मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे आढळून आला.