रामपूर – मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या माजी जिल्हा संयोजक अनुराग शर्मा यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्यांचे मित्र भाजपाचे माजी जिल्हा मंत्री छत्रपाल यादव आणि त्यांच्या भावासह ४ आरोपींना अटक केली आहे. छत्रपाल याचा भाऊ पवनने दोन आरोपींना बाईक आणि इतर साहित्य उपलब्ध करुन दिलं होतं.
या आरोपींनी २० मेच्या रात्री अनुरागला गोळ्या घालून ठार केले होते. आरोपी छत्रपाल यादव, त्याचा भाऊ पवन, बाबू उर्फ हिमांशु आणि राजकिशोर यांना अटक करणार्या पोलिस पथकाला एसपीने २० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्तूल, दोन गोळ्या आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे. एसपी शगुन गौतम यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, अनुराग शर्मा यांना ठार मारण्याचे षडयंत्र त्यांचे इतर निकटवर्तीय भाजपाचे माजी जिल्हामंत्री छत्रपाल यादव यांनी केले होते.
अनुरागला आपल्या मार्गातून काढून टाकण्यासाठी दोन अशा आरोपींची निवड केली जे त्याचा बदला घेतील. छत्रपालची आर्थिक परिस्थिती खालावली होती. छत्रपाल यादव याने काही वर्षांपूर्वी चिट फंड कंपनी उघडली, त्यामध्ये त्याला नुकसान सोसावे लागले. याप्रकरणी त्याच्यावरही खटला दाखल करण्यात आला होता. ज्यांनी कंपनीत पैसे गुंतवले होते ते त्यांचे पैसे परत मागत होते. छत्रपाल यांचे अनुरागशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याने बायकोचे दागिनेही दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग आता पत्नीच्या दागिन्यांची परत मागणी करत होता तर इतर लोक त्याच्याकडे पैशांची मागणी करत होते. अशा परिस्थितीत, छत्रपालने अनुरागला काटा काढत आपल्या कमाईसह परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची योजना आखली.
यासाठी त्याने हिमांशू उर्फ बाबूकडे संपर्क साधला. सुनीलवर त्याच्या वडिलांच्या हत्येचा आरोप होता. नंतर अनुरागने या प्रकरणात दबाव टाकून तडजोड करण्यास भाग पाडलं. यामुळे हिमांशूचा अनुरागवर राग होता. छत्रपालने नूरमहाल गृहनिर्माण विकास कॉलनी येथील हिमांशू व राजकिशोर यांच्याशी संपर्क साधला. राजकिशोरने एकदा अनुरागवर जीवघेणा हल्ला केला होता, तो बचावला होता, या प्रकरणी छत्रपालने दोघांशी बोलून सुपारी दिली.
भाजप नेते छत्रपाल याने राजकिशोर याला धमकावले की, हा करार झाला आहे, परंतु अनुराग तुला सोडणार नाहीत. तुझ्याकडे आता अनुरागला वाटेतून काढणं हा एकच मार्ग आहे. यासाठी मी तुला एक माणूस व शस्त्र देईन. छत्रपालच्या योजनेनुसार २० मे रोजी त्याचा भाऊ पवनने मोटरसायकल, दोन काडतुसे आणि पिस्तुल पुरविली. या दोघांनी २० मे रोजी रात्री स्कूटीवरून घरी जात असताना अनुरागला आगपूर रोडवर गोळी घातली त्यात तो जागीच ठार झाला.